मर्चंट नेव्ही काय असते मी करू शकतो का

परवा परवा १० वी आणि १२ वीच्या परीक्षा आटोपल्या आहेत. यानंतर विद्यार्थी व पालकांसमोर प्रश्न उभा राहतो आता पुढे काय? पारंपरिक शिक्षण किंवा यापेक्षा वेगळं काही. ज्यांना परंपरागत शिक्षणाची चौकट ओलांडून 'जरा हटके' करिअरचा विचार असेल त्यांच्यासाठी मर्चंट नेव्ही हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मर्चंट नेव्हीतील तरूण तरुणींना कमी वयात शाश्वत नोकरीसोबतच उत्तम पगार मिळू शकतो. तर चला जाणून घेऊन मर्चंट नेव्हीतील करिअरविषयी...

मर्चंट नेव्ही म्हणजे नेमकं काय?
जगातील एकूण व्यापारापैकी ९० टक्के व्यापार हा सागरी मार्गाने होतो. जवळपास ५० हजार पेक्षा जास्त जहाजं ही मर्चंट या प्रकारात मोडतात. जलवाहतूक हा जगात सर्वात स्वस्त मार्ग आहे. भविष्यातही या वाहतुकीत आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मर्चंट नेव्हीतील करिअर हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मर्चंट नेव्ही हे व्यावसायिक क्षेत्र आहे तर भारतीय नौदल हा संरक्षण खात्याचा भाग आहे. यामुळे मर्चंट नेव्ही आणि भारतीय नौदल या दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत. मर्चंट नेव्हीमध्ये प्रामुख्याने तीन विभाग येतात- हे विभाग जहाजाच्या रचनेवर अवलंबून असतात. पहिला विभाग असतो तो म्हणजे शिप-डेक, यामध्ये कॅप्टन, मुख्य अधिकारी, द्वितीय श्रेणी अधिकारी, तृतीय श्रेणी अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी यांचा समावेश असतो. या खालोखाल दुसरा टप्पा येतो तो म्हणजे इंजिन. यामध्ये मुख्य अभियंता, रेडिओ अधिकारी, इलेक्ट्रिकल अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता यांचा समावेश असतो. त्या खालोखाल सलूनचा टप्पा येतो. यामध्ये केटरिंगचा विभाग येतो. यापैकी कोणत्याही विभागात काम करायचे असेल तर त्यासाठी प्रमाणित प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.

मर्चंट नेव्हीसाठी पात्रता

अ) डेक ऑफिसर :- या विभागातील ऑफिसरला जहाजाला दिशा देण्यापासून अन्य महत्त्वाची कामे करावी लागतात. केवळ १८ ते २५ वयोगटातील उमेदवारच डेक ऑफिसर म्हणून काम करू शकतात. डेक ऑफिसर निवडण्यासाठी दोन पर्याय आहेत. (पर्याय १) :- बी.एस्सी (नॉटिकल सायन्स) हा ३ वर्षाचा कोर्स उत्तीर्ण करणे गरजेचे आहे. बी.एस्सी इन नॉटिकल सायन्स हा कोर्स करण्यासाठी उमेदवाराला १२ वीमध्ये 'पीसीएम' ग्रुपमध्ये किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे किंवा तो बी.एस्सी इन फिजिक्स असावा किंवा त्याला बी.ई./बी.टेक च्या अंतिम वर्षात किमान ५० टक्के गुण आवश्यक असावे. (पर्याय २):-डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स हा १ वर्षाचा कोर्स उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवाराला १२ वीमध्ये 'पीसीएम' ग्रुपमध्ये किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. किंवा तो बी.एस्सी इन फिजिक्स असावा किंवा त्याला बी.ई./बी.टेक च्या अंतिम वर्षात किमान ५५ टक्के गुण आणि १० वी १२ वी किंवा पदवीमध्ये इंग्रजी विषयात ५० टक्के गुण असावे.

ब) इंजिन विभाग :- या विभागातील अभियंत्याला इंजिनची संपूर्ण प्रणाली नियंत्रित करण्याची जबाबदारी असते. १८ ते २८ वर्षे वयोगटातील उमेदवारांचीच या विभागात नियुक्ती होते. ही निवड होण्यासाठी ३ पर्याय आहेत. (पर्याय १):- ४ वर्षाची मरीन इंजिनीअरिंग पदवी. या अभ्यासक्रमासाठी आवश्यक पात्रता पुढील प्रमाणे. 'पीसीएम' ग्रुपमध्ये सरासरी ६० टक्के गुणांसह १२ वी उत्तीर्ण किंवा एआयसीटीई मान्यताप्राप्त इंजिनीअरिंग महाविद्यालयातून ६० टक्के गुणांसह मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल विषयाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण किंवा ५५ टक्के गुणांसह डिप्लोमा इन इंजिनीअरिंग.

(पर्याय २) :- २ वर्षाचा मरिन इंजिनीअरिंग डिप्लोमा. या अभ्यासक्रमासाठी पात्रता पुढीलप्रमाणे १० वी, १२ वी किंवा डिप्लोमामध्ये इंग्रजी विषयात ५० टक्के गुण अधिक मेकॅनिकल / इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रानिक्स / मरिन / नेवल ऑर्किटेक्चर विषयात ५० टक्के गुणांसह डिप्लोमा उत्तीर्ण.

(पर्याय ३) :- १ वर्षाचा मरिन इंजिनीअरिंग कोर्स : या अभ्यासक्रमासाठी आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे १० वी, १२ वी किंवा डिप्लोमामध्ये इंग्रजी विषयात ५० टक्के गुण अधिक ४ वर्षाचा मेकॅनिकल/ मेकॅनिकल आणि ऑटोमेशन इंजिनीअरिंग / नेवल ऑर्किटेक्चर इंजिनीअरिंग आवश्यक.

क) सलून विभाग :- या विभागात येण्यास इच्छूक असलेल्या उमेदवाराला सरासरी ४० टक्के गुणांसह १० वी, इंग्रजी विषयात ४० टक्के गुण, किमान १५७ सेमी उंची आणि ४८ किलो वजन असणे आवश्यक आहे. उमेदवाराला रंगआंधळेपणा नसावा.

डेक, इंजिन आणि सलून विभागातील उमेदवारांना या सर्व अभ्यासक्रमासह विशिष्ट कालावधीतील ट्रेनिंग उत्तीर्ण करणे देखील आवश्यक असते.

मर्चंट नेव्ही हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा कणा आहे. मर्चंट नेव्हीशिवाय आयात-निर्यात होणे कठीण आहे. यामुळे या क्षेत्राला कधीही धोका नाही. प्रशिक्षित तरुणांना जहाजावरील डेक आणि इंजिन विभागात नोकरीच्या उत्तम संधी आहेत. देशातही सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये तरुणांना मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जर तुम्हाला कमी वयात सन्मानाचे जीवन जगण्यासोबत जगभ्रमंती करायची असेल तर तुम्ही या क्षेत्राचा नक्की विचार करा.

Comments

Popular posts from this blog

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस 2019